Prakashakachi Prakashwaat | प्रकाशकाची प्रकाशवाट

Prakashakachi Prakashwaat : शारदा प्रकाशनचे सर्वेसर्वा प्रा. डॉ. संतोष राणे यांच्यावर ‘प्रकाशकाची प्रकाशवाट’ हा लेख दैनिक ‘तरुण भारत’ मध्ये नुकताच छापून आला आहे. हा लेख खास तुमच्यासाठी इथे प्रसिद्ध करीत आहोत.

फक्त एक संधी हवी

प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असते जिच्यामुळे त्या व्यक्तीचे आयुष्य आमुलाग्र बदलून जाते. प्रत्येकाला फक्त, फक्त एक संधी हवी असते ज्या संधीमुळे त्याला स्वतःला सिद्ध करता येते. अमृताचा फक्त एकच थेंब हवा असतो ज्यामुळे पुन्हा जीवात जीव निर्माण होतो. हजारो विद्यार्थी, शेकडो लेखक, मैत्र, सहकारी आणि असे कितीतरी जण ज्यांच्या आयुष्यात असे आमुलाग्र परिवर्तन आणणारे अमृतमयी व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाणे येथील डॉक्टर प्रा.संतोष लक्ष्मण राणे.

ठाण्यातील ठाण्यात असा कुठलाही लेखक नाही, प्राध्यापक नाही, राजकारणी नाही जो प्रा.संतोष राणे यांना ओळखत नाही. आज त्यांचीच ओळख ‘तरुण भारत’ च्या सर्व वाचकांना व्हावी यासाठी हा त्यांच्या विषयी विशेष लेख!

सध्या ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत असलेले विद्यार्थीप्रिय असे राणे स्वतः ‘शारदा प्रकाशन’ या त्यांच्या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक आणि संस्थापक आहेत. आपल्या प्रकाशन संस्थेचा वटवृक्ष त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या नावे रुजवला आहे, त्यामुळे तो फोफावला नसता तरच नवल!

वाचन वेडा पुस्तक मित्र

संतोष राणे मूळचे मुंबईचे. सांताक्रुज मधील त्यांचा जन्म. त्यांचे शिक्षण महापालिकेच्या शाळेतून पूर्ण झाले. राणे यांचे वडील एका नामांकित मेलमध्ये मोठ्या पदावर नोकरी करत होते. त्यांची नोकरी सांभाळत जोपासलेली वाचनाची आवड संतोष यांच्यात लहानपणापासूनच आली. तेव्हा राहत असलेल्या बैठक चाळीमधील शेजारच्या काकूंनी सुरू केलेल्या लायब्ररीचे सभासदत्व त्यांच्या वडिलांनी त्यांना घ्यायला सांगितले आणि तेव्हापासूनच ते पुस्तक मित्र बनले.

सर्व काही सुरळीत चालू असताना एकाएकी मिल बंद पडण्याची लाट आली आणि त्याचा फटका राणे कुटुंबीयांना देखील बसला. जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी वडिलांच्या जोडीने संतोष यांची आई ही ठामपणे उभी राहिली. त्यांनी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

घरची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी लहान वयातच संतोष यांनीही त्यांच्या परीने हातभार लावण्यास सुरुवात केली. फुलवाल्याकडे बनविणे, अगरबत्ती बनवणे अशी कामे ते प्रामाणिकपणे करू लागले. मात्र हे करत असताना त्यांनी शिक्षण आणि साहित्याची मैत्रीही जपली. आवडती पुस्तके वाचून अनेक साहित्यिकांना त्यांनी अभिप्राय पत्रे लिहिली. आपली साहित्यिक आवड जपत असतानांच त्यांनी घरची जबाबदारीही सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने ते ठाण्यात स्थलांतरित झाले. तेव्हाही शिक्षण घेत असतानाच घरोघरी पेपर टाकण्यापासून मिळेल ती काम करत चार पैसे जमवण्यात त्यांनी यश मिळवले.

शैक्षणिक प्रगती

राणे यांचे महाविद्यालयीन शिक्षण ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम. एस. चे शिक्षण पूर्ण केले. उल्हासनगरच्या सेवा सदन येथून त्यांनी बी.एड. ही पदवी प्राप्त केली. यावरच ते थांबले नाहीत. पुढे त्यांनी सेंट झेवियर्स’ मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यशवंतराव मुक्त विद्यापीठातूनही त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सेट सारखी कठीण परीक्षा देखील ते उत्तीर्ण झाले. तेव्हा या परीक्षेत केवळ तीन टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते आणि त्यामध्ये ते एक होते हे विशेष. नुकतीच त्यांनी सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्य सांभाळत लोकमान्य टिळक यांच्या लेखन कार्याचा अभ्यास या विषयावर पीएचडी प्राप्त केली आहे.

आई-वडिलांचे आशीर्वाद, पत्नी आणि मुलाची साथ, याशिवाय बाहेर येईल जगातही त्यांना अनेकांनी त्यांच्या यशात साथ सोबत केली. प्रा. प्रवीण दवणे, प्रा. प्रदीप ढवळ, कवी राम कदम यासारख्या अनेकांनी त्यांना वेळोवेळी उत्तम संस्कार करीत मार्गदर्शन केले. आयुष्यात वेळोवेळी भेटलेल्या या सर्व सद प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळेच त्यांचे जीवन समृद्ध झाले आहे असे ते म्हणतात.

शारदा प्रकाशाची मुहूर्तमेढ

चेतना प्रकाशन या विख्यात प्रकाशन संस्थेत नोकरी करत असताना प्रकाशन व्यवसाय कसा करावा कसा हाताळावा हे संपूर्ण शिकून घेतले. जिथे आपण सेवा देत आहोत नोकरी करत आहोत, तिथे प्रामाणिक प्रामाणिकपणाने आणि झटून काम करायचे ही त्यांची खासियत आहे. याच दरम्यान त्यांच्या बोलघेवड्या आणि समोरच्याला आश्वस्त करणाऱ्या स्वभावाने अनेक लेखक, लेखिका यांनी त्यांना पुस्तक प्रकाशित करण्याविषयी विचारणा केली. नवोदितांना व्यासपीठ खुले करून देण्याच्या ध्येयाने त्यांनी आपल्या ‘शारदा प्रकाशन’ या संस्थेची निर्मिती केली. मागची पंचवीस वर्षे ही संस्था अनेक लेखकांना, कलाकारांना, सामान्य व्यक्तींना लिहिते करत आहे. कविवर्य पी सावळाराम यांचा गौरव ग्रंथ शारदा प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला होता. प्राध्यापक केशव मेश्राम यांचा शब्दबंध हा संग्रह देखील शारदा प्रकाशन तर्फे प्रकाशित करून राणे यांनी आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पुस्तक जर शारदा प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणार असेल तर त्याची गुणवत्ता नक्कीच जपली जाईल असा विश्वास लेखकांना असतो आणि म्हणूनच ते शारदा प्रकाशन कडे येतात. त्यामुळे फक्त ठाणे मुंबई महाराष्ट्रातूनच नाही तर देशातील इतर राज्यातून आणि परदेशातूनही पुस्तक प्रकाशित करण्यासाठी संतोष राणे यांच्या शारदा प्रकाशन संस्थेला प्राधान्य दिले जाते.

एक हजार पेक्षा जास्त पुस्तकं या प्रकाशन संस्थेच्या नावावर आहेत. संस्कृत मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड ,मल्याळम आणि तेलुगु भाषेत त्यांच्या शारदा प्रकाशन तर्फे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एकाच वेळी 25 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

जोशी बेडेकर महाविद्यालयात सह प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख अशी जबाबदारी सांभाळत ते ग्रंथ प्रकाशन आणि ग्रंथ वितरण या क्षेत्रातही आपले योगदान देत आहेत. ते एक उत्तम निवेदकही आहेत. अनेक राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्यक्रमांचे यशस्वी निवेदन त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

राणे यांच्या या कार्याचा आतापर्यंत अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करून गौरव केलेला आहे.

सहजीवन फाउंडेशन तर्फे ग्रंथमित्र पुरस्कार, एकता कला अकादमी तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार , ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे गुणीजन पुरस्कार, नाशिक येथील साहित्य सेवा पुरस्कार , शिक्षण संवेदन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार , सांदिपनी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

अशा या मातब्बर, हरहुन्नरी, सदैव हसतमुख, साहित्य सेवेसाठी आणि ज्ञान दानासाठी सदैव हसतमुख चेहऱ्याने तत्पर असलेल्या डॉ. प्रा. संतोष राणे यांना त्यांच्या पुढील कारकीर्दीय वाटचालीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
  • Your cart is empty.